Friday, December 4, 2009

मी हे करू शकतो!


लहानपणा पासून प्रत्येक गोष्ट वेळेवर मिळाल्या नंतर जर कॉलेज नंतर लगेच जॉब मिळाला नाही तर मनाची मोठी चलबिचल होत. नोकरी नसेल तर माणसांच्या नजरे बरोबर लोकांची आपल्याशी असणारा संवाद बदलत जातो. याच काळात आपली स्वताहाची किंमत आपल्या कळते. सकाळी उठेल्यावर आपल्यातील रितेपणाची जाणीव अस्वस्थ करतेय, संवेदन शून्यतेने दिवस ढकलावे लागतात. खरे तर ही परिस्थिती कायम अशीच राहणार नसते. संधी कोणत्या न कोणत्या रूपाने आपले दार ठोठावणार असते. मात्र तरीही हा काळ दुख:द असतो.
याचा परिणाम आत्मविश्वासावर होतो. आत्मविश्वास डळमळीत होण्यास सुरवात होते. संभ्रमावस्था वाढत जाते. या काळात आलेला नवा विचार एक संधी घेवून येतो शिवाय एक मोठे आव्हान आणि जोखीम सुद्धा घेऊन येतो. जर या संधीच आपण सोने करू शकलो नाही आणि अपयश पदरात पडले तर दरीत कोसळल्या सारखी स्थिती निर्माण होऊ शकते. असा आलेला विचार कोणतीच निर्णायक कृती करू देत नाही. वास्तवात आपला पराभव कोणीच करू शकत नाही मात्र मनात येणारे नकारार्थी विचारच आपला पराभव करून मोकळे होतात.
जीवन आपल्याला नेहमीच नवी संधी देत असतो. फक्त आपण त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे. आयुष्यात माणसाला भरपूर माहिती असून सुद्धा केवळ योग्य वेळी कृती न केल्यामुळे आयुष्यभर दुखी राहावे लागते. त्यामुळे प्रत्त्येकाने योग्य वेळी कृती करण्याची गरज आहे. आणि हे केवळ तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण आपल्या कामावर विश्वास ठेवून काम सातत्याने करत राहू.